
पुणे, 15 एप्रिल (हिं.स.) : कोकणातील हापूसच्या तुलनेत कर्नाटकातील हापूस आंब्याचे दर नेहमीच कमी असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा कल या आंब्याकडे अधिक असल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाल्याने बाजारातील दर सध्या नियंत्रणात राहिले आहेत.
गेल्या 1 एप्रिलपासून कर्नाटक हापूसचा हंगाम सुरू झाला असून, सध्या विविध भागांतून दररोज सुमारे दोन ते अडीच हजार पेट्या आणि दोन ते तीन हजार बॉक्स बाजारात दाखल होत आहेत. मागणीच्या तुलनेत पुरेसा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याला चांगली मागणी असून, बाजारात येणारा माल तत्काळ विक्री होत आहे. दरम्यान, 20 एप्रिलनंतर आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुढील आठवड्यात आवक वाढल्यास दरात काही प्रमाणात घट होऊ शकते, असा अंदाजही व्यापाऱ्यांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना आगामी काळात आणखी स्वस्त दरात हापूस आंब्याचा आनंद घेता येण्याची शक्यता आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु