
रायगड, 15 एप्रिल (हिं.स.) : पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरान येथे काल रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास एका वाहन चालकाला रस्त्यालगत बिबट्या दिसला. अचानक समोर आलेल्या या वन्यप्राण्यामुळे चालक काही काळ घाबरून गेला, मात्र सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व वनविभागाने तत्काळ हालचाल केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे तसेच दुर्गम भागात एकट्याने जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
माथेरान परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने येथे बिबट्यांचा वावर अधूनमधून आढळतो. मात्र पर्यटन हंगाम सुरू असताना अशा घटनांमुळे पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने नागरिकांना कोणताही वन्यप्राणी दिसल्यास त्याला चिथावणी देऊ नये किंवा जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट केले आहे. तसेच अशा घटना घडल्यास तात्काळ प्रशासनाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)