
लातूर, 15 एप्रिल (हिं.स.) : नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरणातून उदगीर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीचा एअर व्हॉल्व्ह (Air Valve) रात्रीपासून नादुरुस्त झाल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. अहमदपूर तालुक्यातील हडोळती ते सावरगाव दरम्यान ही गळती सुरू असून, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे पाण्याचे मोठे लोंढे रस्त्यावरून वाहत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्हमध्ये अचानक बिघाड झाला. पाण्याचा दाब प्रचंड असल्याने व्हॉल्व्हमधून पाणी मोठ्या वेगाने बाहेर फेकले जात आहे. रात्रभर हे पाणी वाहत राहिल्याने हडोळती-सावरगाव रस्त्याला एखाद्या नदीचे स्वरूप आले आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर जिथे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, तिथे तांत्रिक बिघाडामुळे शुद्ध पाणी नाल्यात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सततच्या पाणी गळतीमुळे रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे पडले असून संपूर्ण परिसरात चिखल झाला आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना प्रवास करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात या गळतीचा अंदाज येत नसल्याने अपघाताची टांगती तलवार कायम आहे.उदगीर शहराला पाणी नेणारी ही मुख्य वाहिनी असल्याने, एअर व्हॉल्व्ह दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा बंद करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो.
यासंदर्भात परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी सांगितले की, काल रात्रीपासून एअर व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात आहे. तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करणे गरजेचे होते, मात्र अद्यापही पाणी सुरूच आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन ही गळती थांबवावी. अशी मागणी केलीय.
-----------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis