

अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) | अमरावती जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याच्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला आहे.
या प्रकरणी आरोपी अयान अहमद तनविर अहमद (वय १९, रा. परतवाडा) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २९४, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम कलम ८ व १२ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६७ व ६७ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला रात्री अटक केली असून न्यायालयाने त्याला दि. २१ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान आरोपीकडून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून त्यातील माहितीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या पीडितांची ओळख पटविण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत. तसेच, या प्रकरणात आणखी काही पीडित मुली आहेत का, याबाबतही सखोल चौकशी सुरू आहे.
दरम्यान, तपासात आरोपी अयानच्या मोबाईलमधून उजेर खान इकबाल खान (वय २०, रा. अचलपूर) याने संबंधित व्हिडिओ प्रथम डाउनलोड केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध अटकेची प्रक्रिया सुरू आहे.या संवेदनशील प्रकरणात पीडित मुली व त्यांच्या कुटुंबियांना पुढे येऊन तक्रार देताना कोणतीही भीती किंवा असहजता वाटू नये, यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. महिला सहाय्यता कक्षामार्फत संपर्क साधण्यासाठी महिला पोलिस अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. पीडितांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये न जाता या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली माहिती देऊ शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासना तर्फे सखी वन स्टॉप सेंटरमार्फतही मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती, पुरावे किंवा तपशील नागरिकांकडे असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्रीही पोलिसांनी दिली आहे.या प्रकरणासंदर्भात कोणत्याही व्यक्तीकडे काही माहिती अथवा पूरावा उपलब्ध असल्यास संबंधितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून सहकार्य करावे. माहिती देणा-याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल.असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
महीला पोलीस अधिकारी यांचे संर्पक क्रमांक
१) स.पो.नि. प्रियंका भोयर, प्र. अधिकारी, महीला सहाय्यता कक्ष, अमरावती
8484957827
२) पो.उप.नि. स्नेहल आडे, पो.स्टे. परतवाडा
9096026424
संध्या भालेराव ,9021935015
सखी वन स्टॉप सेंटर, अमरावती
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी