छ. संभाजीनगर - पारा गेला ४० अंशांवर; विहिरी तळाला
छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.) - तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून, उष्ण
छ. संभाजीनगर - पारा गेला ४० अंशांवर; विहिरी तळाला


छत्रपती संभाजीनगर, 15 एप्रिल, (हिं.स.) - तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोचले. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा तीव्र त्रास सहन करावा लागत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून, उष्ण लहरींचा प्रभाव कायम राहील. त्यामुळे दुपारच्या वेळेत उकाडा अधिक जाणवायला लागला आहे. तालुक्यासह ग्रामीण भागात सकाळी दहापासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी रस्त्यावर शुकशुकाट राहत आहे. दोन दिवसांपासून उष्णतेत वाढ झाली असून, काळजी घेण्याचा सल्लाही प्रशासनाकडून दिला आहे.

वाढत्या उन्हामुळे नैसर्गिक जलसाठे कोरडे पडायला लागले आहेत. सोयगाव परिसरात विहिरीही तळ गाठायला लागल्या आहेत. तालुक्यातील धरणे, पाझर तलावांतील पाणी जेमतेम उरले असून, किमान पुढचे १५ ते २० दिवस साठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा कडाका वाढतच राहणार असल्याने मे महिन्यात धरणे, पाझर तलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपक्ष्यांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वाढत्या तापमानामुळे शेतीकामांवरही परिणाम होत असून, शेतकरी व मजूरवर्गाला अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे दुपारी शेतशिवार ओस पडत आहेत. शेतकरी सकाळी लवकर शेतीची कामे आटोपून घेत आहेत. सायंकाळी पुन्हा शेतशिवारात लगबग सुरू होते.

नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय दुपारी घराबाहेर पडणे टाळण्याचे व भरपूर पाणी पिण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande