
पुणे, 15 एप्रिल (हिं.स.)। शहरातील रहिवासी सोसायटीधारकांवर गेल्या अनेक वर्षांपासून पडत असलेल्या पाणी खर्चाच्या अन्यायकारक बोजाबाबत पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. २०१९ पासून सोसायट्यांनी विकत घेतलेल्या पाण्याचा संपूर्ण खर्च संबंधित बांधकाम व्यावसायिकांकडून वसूल करण्याचे आदेश तातडीने द्यावेत, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.
पाणीप्रश्नांबाबत महापालिकेत अधिकारी आणि हाउसिंग सोसायटी फेडरेशनची बैठक झाली. यावेळी माजी महापौर राहुल जाधव, नगरसेविका सुजाता बोराटे, योगेश लांडगे, अश्विनी वाबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी विजयसिंह भोसले, फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, संदीप कुंभार, दिलीप कांबळे उपस्थित होते.
अनेक बांधकाम व्यावसायिकांनी गृहनिर्माण प्रकल्प सुरू करताना सोसायट्यांना स्वखर्चाने पाणीपुरवठा करण्याची लेखी हमी दिली होती. मात्र, प्रत्यक्षात या हमीपत्राचे उल्लंघन करण्यात आले असून, त्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसला आहे. त्यामुळे हा केवळ प्रशासकीय प्रश्न नसून नागरिकांवरील आर्थिक अन्यायाचा गंभीर प्रकार आहे. हमीपत्राचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करावेत. भविष्यात अशा व्यावसायिकांना कोणतीही नवीन बांधकाम परवानगी किंवा पूर्णत्व प्रमाणपत्र देऊ नये. प्रशासनाने आता कठोर निर्णय घेतला नाही, तर ही प्रवृत्ती आणखी वाढेल, अशी भूमिका फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.
--------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु