
परभणी, 15 एप्रिल (हिं.स.) । परभणी येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील सभागृहात श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या चरित्रावर आधारित गद्य रूपांतर पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
शिर्डीच्या साईबाबांचे गुरू तथा शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या ओवीबद्ध चरित्राचे गद्य रूपांतर त्यांच्या वंशज अनुराधा प्रभाकर सुभेदार यांनी केले असून या ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीनगर येथील पत्रकार तथा लेखक शरद देऊळगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजलगाव येथील ह.भ.प. प्रणव पटवारी उपस्थित होते. व्यासपीठावर लेखिका अनुराधा सुभेदार, ऍड. एल.एम. सुभेदार, डॉ. सुधाकरराव सुभेदार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी लेखिका अनुराधा सुभेदार यांनी सांगितले की, संतश्रेष्ठ दासगणू महाराजांनी लिहिलेल्या ओवीरूप चरित्रातून प्रेरणा घेऊन हे गद्य रूपांतर करण्यात आले आहे. सुभेदार घराण्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा हा या ग्रंथनिर्मितीचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संस्थानासाठी विविध देणग्याही देण्यात आल्या. ह.भ.प. प्रणव पटवारी यांनी या ग्रंथामुळे महाराजांचे चरित्र समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात शरद देऊळगावकर यांनी मंदिराशी असलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, हा ग्रंथ प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ह.भ.प. संजय पिंपळगावकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभेदार परिवार व विविध मान्यवरांनी सहकार्य केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis