रायगड - वाघ्रण गावचे सुपुत्र सन्मान पाटील यांची न्यायाधीशपदी झेप
रायगड, 15 एप्रिल (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावचे सुपुत्र ॲड. सन्मान पाटील यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेत यश संपादन करत न्यायाधीशपदी झेप घेतली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ॲड दत्ता पाटील
Samman Patil, the son of Vaghran village, becomes a judge


रायगड, 15 एप्रिल (हिं.स.)। अलिबाग तालुक्यातील वाघ्रण गावचे सुपुत्र ॲड. सन्मान पाटील यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) परीक्षेत यश संपादन करत न्यायाधीशपदी झेप घेतली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ॲड दत्ता पाटील विधी महाविद्यालय येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांच्या हस्ते सन्मान पाटील व त्यांच्या आई-वडिलांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे वाघ्रण गावासह संपूर्ण अलिबाग तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

सन्मान पाटील यांनी अलिबाग येथे शालेय व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जे एस एम कॉलेज मधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर २०१७ मध्ये अॅड. दत्ता पाटील विधी महाविद्यालय येथून एलएलबी पूर्ण केले. वडील ॲड. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग जिल्हा न्यायालयात वकिली करत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

लॉकडाऊनच्या काळात जिद्द आणि सातत्य ठेवत त्यांनी या परीक्षेत यश मिळवले. “न्यायाधीश पद हे समाजातील अत्यंत मानाचे पद आहे. सातत्य, संयम आणि आत्मविश्वास या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवून मी हा प्रवास पूर्ण केला,” असे सन्मान पाटील यांनी सांगितले.

महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे कायद्याच्या मूलभूत संकल्पना भक्कम झाल्या, तसेच मूट कोर्ट स्पर्धांमधील सहभागामुळे वकिलीचा पाया मजबूत झाला, असे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयामुळे कायद्याचे शिक्षण सुलभ झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande