
अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) | ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देणारी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (नरेगा) यंदा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरवर्षी एक एप्रिलपासून मजुरी दरात वाढ करण्याची दोन दशकांची परंपरा यंदा केंद्र शासनाने खंडित केली असून, मजुरी ३१२ रुपये म्हणजेच ‘जैसे थे’ ठेवण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात नरेगा अंतर्गत मजुरांना दररोज केवळ ३१२ रुपये इतकी मजुरी मिळत आहे. यंदा या दरात वाढ होईल, अशी अपेक्षा मजुरांनी व्यक्त केली होती. मात्र केंद्राकडून एक रुपयाचीही वाढ जाहीर न झाल्याने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे. महागाईने कळस गाठलेला असताना ३१२ रुपयांत संसार चालवणे कठीण होत असल्याची भावना मजूर व्यक्त करीत आहेत.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे मजुरांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत. उन्हाळा सुरू होताच शेतीची कामे आटोपतात आणि मोठ्या प्रमाणात मजूर नरेगाच्या कामांकडे वळतात. राज्यात जलसंधारण, फळबाग लागवड, ग्रामीण रस्तेबांधणी, यासारखी हजारो कामे सुरू आहेत. दररोज सुमारे १० ते १५ लाख मजूर राज्यात कार्यरत असतात, तर देशभरात हा आकडा पाच ते सहा कोटींच्या घरात पोहोचतो. नरेगा ही ग्रामीण रोजगाराची कणा मानली जाते. अशा परिस्थितीत मजुरीवाढ न झाल्याने शेतमजुरांचे आर्थिक गणित बिघडले असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महागाईच्या पार्श्वभूमीवर मजुरीत वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र या निर्णयामुळे मजुरांच्या आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे भविष्यात नरेगा कामांबाबत मजुरांचा प्रतिसाद कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील स्थिती
अमरावती जिल्ह्यात सध्या ‘मग्रारोहयो’ अंतर्गत १८१७ कामे सुरू असून, सुमारे २३ हजार ८५४ मजूर कार्यरत आहेत.ग्रामरोजगार सेवकांच्या संपामुळे अनेक ठिकाणी कामांची मागणी नोंदविली जात नसल्याने सुमारे ३० हजार मजुरांचा रोजगार ठप्प झाला आहे. दरवर्षी या काळात चार हजारांहून अधिक कामे सुरू असतात आणि ५० ते ६० हजार मजूर कार्यरत असतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी