अमरावतीत नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून आयुक्त वर्षा लड्डा यांनी विविध भागांचा पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे कडक निर्देश दिले. वाहतू
अमरावतीत नागरी समस्यांवर ‘ॲक्शन मोड’; आयुक्त वर्षा लड्डा यांची पाहणी, अतिक्रमण व स्वच्छतेवर कडक कारवाईचे आदेश


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : शहरातील वाढत्या नागरी समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून आयुक्त वर्षा लड्डा यांनी विविध भागांचा पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना तातडीने कामाला लागण्याचे कडक निर्देश दिले.

वाहतूक कोंडी, अस्वच्छता, अतिक्रमण आणि कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. पाहणी दौऱ्याची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्विन) येथून करण्यात आली. त्यानंतर आयएमए हॉल कॅम्प, रोज गार्डन, सायन्सकोर मैदान, उस्मानीया मस्जिद, मालवीय चौक आणि जयस्तंभ चौक या वर्दळीच्या भागांची पाहणी करण्यात आली.

या ठिकाणी स्वच्छतेची स्थिती, रस्त्यांवरील अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी याचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभागांना ठोस उपाययोजना राबवण्याचे आदेश देण्यात आले. खापर्डे बगीचा, बस स्टॅण्ड रोड, हमालपूरा, रेल्वे स्टेशन परिसर, गांधी चौक, गौरक्षण चौक तसेच राजकमल चौक-उड्डाणपूल परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आढळून आले. पथारीवाल्यांमुळे रस्त्यांची रुंदी कमी होत असल्याने तातडीने अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देण्यात आले.

अंबादेवी मंदिर ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या मार्गावर रात्रीच्या वेळी फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत विशेष मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित विभागांनी समन्वयाने कारवाई करून रस्ते मोकळे ठेवण्यावर भर देण्याचे सांगण्यात आले.

राजापेठ कोठा व ट्रान्सफर स्टेशन येथे कचरा व्यवस्थापनाची पाहणी करून स्वच्छता अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच डिव्हायडर स्वच्छ ठेवणे, अडथळा ठरणारे कंटेनर हटवणे आणि कचरा संकलन व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले.

प्रशांत नगर परिसरातील उद्यानांची पाहणी करताना त्या ठिकाणी नियोजनबद्ध विकासाची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. नागरिकांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्यानांचे सुशोभीकरण तसेच ‘खाऊ गल्ली’ सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि घंटागाडीमध्येच कचरा द्यावा, असे आवाहन करत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. “प्रत्येक विभागाने जबाबदारीने आणि समन्वयाने काम केल्यास शहरातील समस्या सोडवणे शक्य आहे,” असे सांगत वर्षा लड्डा यांनी अधिकाऱ्यांना कार्यक्षमतेने काम करण्याचे आदेश दिले.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande