
रायगड, 17 एप्रिल (हिं.स.)। दि. 19 एप्रिल 2026 रोजी येणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते, तर तालुका स्तरावरील अधिकारी ऑनलाइन सहभागी झाले होते.जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये.” यासाठी धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, समुद्रकिनाऱ्यांवरील हॉटेल्स तसेच पर्यटनस्थळांवर विशेष पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार, मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे असणे बंधनकारक आहे. या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि शाळांचे मुख्याध्यापक यांनी आपल्या स्तरावर लक्ष ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलीस विभाग किंवा चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, रायगड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. “बालकांचे भवितव्य सुरक्षित ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)