
अकोला, 17 एप्रिल (हिं.स.)।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागरूकता निर्माण करणे आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
या स्पर्धेचा विषय “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेले कार्य” असा असून मतदानाचा हक्क, वारसा हक्क, प्रसूती रजेचा हक्क आदी मुद्द्यांचा अभ्यास अपेक्षित आहे.
स्पर्धा दोन गटांत होणार आहे. पहिल्या गटात आयटीआय व डिप्लोमा विद्यार्थी (शब्दमर्यादा ५०० ते ८००), तर दुसऱ्या गटात खुला वर्ग (शब्दमर्यादा ८०० ते १२००) सहभागी होऊ शकतो.
विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹३१,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹२१,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹११,००० तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल.
स्पर्धकांनी निबंध PDF स्वरूपात सादर करावा लागणार असून मराठी भाषा अनिवार्य आहे. निबंध मूळ (Original) असावा, अन्यथा स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात येईल. सहभागी विद्यार्थ्यांनी आपले नाव, गाव, गट, संपर्क क्रमांक व शैक्षणिक संस्थेची माहिती देणे आवश्यक आहे.
निबंध सादर करण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांनी दिलेल्या ऑनलाइन लिंकद्वारे नोंदणी करून निबंध अपलोड करावा.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे