
अकोला, 17 एप्रिल (हिं.स.) : महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत सार्वजनिक आरोग्य विभागाने एक महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. शासकीय ‘मेनोपॉज क्लिनिक’च्या माध्यमातून महाराष्ट्राने महिलांच्या आरोग्य सेवांमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे.
मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या (मेनोपॉज) कालावधीत महिलांना भेडसावणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि संप्रेरक बदलांवर तज्ज्ञ मार्गदर्शन व उपचार या क्लिनिकद्वारे उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमामुळे मध्यमवयीन महिलांच्या आरोग्य समस्यांकडे अधिक संवेदनशीलतेने लक्ष दिले जात आहे.
या क्लिनिकमध्ये महिलांना विनामूल्य सल्ला, हाडांची घनता तपासणी, हृदयविकार तपासणी, मानसिक समुपदेशन तसेच आवश्यक उपचार सुविधा दिल्या जात आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या सेवा सहज मिळाव्यात यासाठी शासकीय रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांमध्ये ही क्लिनिक कार्यरत करण्यात आली आहेत.
दरम्यान, महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या पुढाकारातून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे राष्ट्रव्यापी अभियानही राबवण्यात येत आहे. या अभियानात महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या सुदृढतेचे मूलभूत आधार असल्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या अंतर्गत देशभरात मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि महापालिका रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी व मार्गदर्शन देण्यात आले. महिला व किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी, सिकल सेल, अॅनिमिया आणि इतर आजारांचे स्क्रीनिंग करण्यात आले. तसेच पोषण, लसीकरण आणि मासिक पाळी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन ही शिबिरांची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. जिल्ह्यासह राज्यभरात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महिलांच्या सर्वांगीण आरोग्य सुधारण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे