अकोल्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात; ‘स्व-गणना’साठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
अकोला, 17 एप्रिल (हिं.स.) : भारत सरकारकडून यंदा देशाची 16 वी जनगणना राबवण्यात येत असून, यामध्ये ‘डिजिटल सेन्सस’ आणि ‘स्व-गणना’ ही सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे
अकोल्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात; ‘स्व-गणना’साठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


अकोला, 17 एप्रिल (हिं.स.) : भारत सरकारकडून यंदा देशाची 16 वी जनगणना राबवण्यात येत असून, यामध्ये ‘डिजिटल सेन्सस’ आणि ‘स्व-गणना’ ही सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.

स्व-गणना या संकल्पनेत नागरिकांना स्वतःच्या मोबाईल किंवा संगणकाद्वारे जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरता येणार आहे. यासाठी आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाच्या आधारे लॉगिन करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. स्व-गणनेचा कालावधी 1 मे 2026 ते 15 मे 2026 असा निश्चित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी विशेषतः शहरी व ग्रामीण भागातील तरुण आणि सुशिक्षित नागरिकांनी पुढाकार घेऊन स्व-गणना पूर्ण करावी, असे आवाहन केले. यामुळे नागरिकांना जनगणनेच्या कार्यात थेट सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.

जनगणनेच्या अंमलबजावणीसाठी अकोला जिल्ह्यात एकूण 2,338 घरयादी गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटामध्ये सुमारे 180 ते 200 घरे किंवा 650 ते 800 लोकसंख्या समाविष्ट आहे. या कार्यासाठी 2,614 प्रगणक आणि 426 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण 23 एप्रिल ते 8 मे दरम्यान चार्ज अधिकारी स्तरावर होणार आहे.

जे नागरिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाहीत, ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांच्याकडे मोबाईल सुविधा उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी 16 मे ते 14 जून दरम्यान प्रशिक्षित प्रगणक घरोघरी भेट देऊन अॅपच्या माध्यमातून माहिती नोंदवणार आहेत.

जनगणनेतून मिळणारी आकडेवारी पुढील 10 वर्षांसाठी शाळा, आरोग्य सुविधा, रस्ते, रेशन, पाणीपुरवठा आणि रोजगार योजनांचे नियोजन ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची अचूक नोंद ही जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाची असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

नागरिकांनी 1 मेपासून सुरू होणाऱ्या स्व-गणना टप्प्यात सहभागी व्हावे. कोणतीही अडचण आल्यास संबंधित तहसील कार्यालय, नगरपरिषद किंवा नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

“जनगणनेतून जनकल्याण” हे ब्रीद साकार करण्यासाठी सर्वांनी या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून अकोला जिल्ह्याची जनगणना 100 टक्के यशस्वी करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी शेवटी आवाहन केले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande