
अकोला, 17 एप्रिल (हिं.स.)।
प्रादेशिक परिवहन कार्यालय,अकोला येथे अकोला जिल्हा कार्यक्षेत्रातील निवासी पत्ता असलेल्या नागरिकांसाठी दुचाकी वाहनांकरिता नविन मालिका (MH30CD) सुरु करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना दुचाकी करीता नियमित विहित शुल्क भरुन तसेच खाजगी चारचाकी व इतर वाहन वर्गाच्या वाहनांसाठी त्या संवर्गातील वाहनांच्या विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरुन आकर्षक/पसंती क्रमांक राखीव करावयाचे आहेत, त्यांनी दिनांक 21/04/2026 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान पसंतीचे क्रमांकाच्या विहित नमुन्यातील अर्जासह आधार कार्ड, रहिवाशी पत्ता पुरावा, पॅनकार्ड या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रती खुल्या लिफाफ्यात कार्यालयाच्या रोख विभागात जमा कराव्यात. सदर लिफाफ्यावर वाहन मालकाचे नाव, वाहन वर्ग, पसंती क्रमांक व आधार लिंक मोबाईल क्रमांक लिहिलेला असावा.
एकाच पसंती क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयीन नोटीस बोर्डवर त्याच दिवशी दिनांक 21/04/2026 रोजी सायंकाळी 04.00 वाजता लावण्यात येईल. सदर लिलाव यादीमध्ये अर्जदाराचे नांव व पसंती क्रमांक असल्यास अर्जदाराने पसंती क्रमांक लिलावाचे शुल्क व्यतिरीक्त लिलावासंदर्भांत अतिरीक्त रकमेचा डी.डी. दिनांक 22/04/2026 रोजी दुपारी 02.30 वाजेपर्यंत रोख विभागात बंद लिफाफयात जमा करावा. लिफाफयावर नांव, पसंती क्रमांक, आधार लिंक असलेलाच मोबाईल क्रमांक, वाहनाचा वर्ग नमूद करावा. त्यानंतर सदर पसंती क्रमांक साठी त्याच दिवशी दुपारी 4.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात लिलाव करण्यात येईल. पसंती क्रमांकाकरीता महाराष्ट्र शासन अधिसुचना क्रमांक एमव्हीआर 0617/प्र.क्र.321/परि-2, दिनांक 30/08/2024 नुसार विहित करण्यात आलेली सुधारित शुल्क लागु राहील.
सदर डीडी आर.टी.ओ. अकोला यांचे नावे राष्ट्रीयकृत /शेडयुल्ड बँक, अकोला जिल्हयातील शाखेचा असावा. डी.डी. हा अर्जदाराच्या स्वत:च्या बँक खात्यातुन काढलेला असावा. तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अन्य नावे असलेला डीडी स्वीकारला जाणार नाही. त्यासोबत अर्जदारास पॅनकार्डची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता आकर्षक/पसंती क्रमांकासाठी मुळ विहित शुल्काचा एक डी.डी. व लिलावा संदर्भात अर्जदाराच्या इच्छेनुसार जादा रकमेचा दुसरा डीडी हे आवश्यक राहतील. एकाच अर्जदाराने एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केल्याचे आढळून आल्यास असा अर्ज रद्द समजण्यात येईल.
लिलाव प्रक्रियेत एखाद्या पसंती क्रमांकाला समान रक्कमेचे डीडी प्राप्त झाल्यास असा क्रमांक अर्जदारांच्या नावाच्या चिठ्ठया टाकून निघालेल्या ईश्वर चिठ्ठीने निश्चित करण्यात येईल. सदर निर्णय सर्वांना लागु राहील. लिलाव सुरु असताना लिलावात सहभागी अर्जदारांनी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीने उपस्थित राहावे. तथापि, अर्जदार उपस्थित असो अथवा नसो संपूर्ण लिलाव प्रक्रिया ही पूर्ण करण्यात येईल.
पसंती क्रमांकाच्या आगाऊ नोंदणीकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय,अकोलाच्या कार्यक्षेत्रातीलच पत्ता असलेल्या वाहनधारकांनीच अर्ज सादर करावेत. कार्यक्षेत्राबाहेरील तसेच चुकीच्या रक्कमेचा जोडलेला डीडी चुकीचा वाहन वर्ग तसेच अचूक/आधार लिंक मोबाईल क्रमांक न लिहिलेले अर्ज बाद ठरविण्यात येईल.
वाहन मालकास पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित शुल्क अदा करुन नोंदणी क्रमांक राखून ठेवता येतो. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1981 च्या नियम 54 अ तसेच महाराष्ट्र शासन अधिसुचना क्रमांक एमव्हीआर 0617/प्र.क्र.321/परि-2, दिनांक 30/08/2024 नुसार राखुन ठेवलेल्या पसंतीच्या नोंदणी क्रमांकाची वैधता ही 180 दिवस असून नोंदणी क्रमांक राखून ठेवल्याच्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास पसंती क्रमांकाची वैधता संपुष्टात येते. तदनंतर वैधता संपलेले पसंती क्रमांक पसंती क्रमांकाच्या पोर्टलवर उपलब्ध होऊन इतरांना ते राखीव करता येतील.
सदर लिलावानंतर लिलावात भाग घेतलेल्या अर्जदारांना त्यांचे पसंतीक्रमांक कार्यालयातून जारी झाल्यानंतर, नविन मालिकेतील उर्वरीत आकर्षक / पसंती क्रमांक जनतेला सीटीझन पोर्टलवर विहित शुल्क भरुन राखीव करता येतील असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री रविंद्र भुयार यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे