
चंद्रपूर, 17 एप्रिल (हिं.स.)। गेल्या वर्षापासून आतापर्यंत प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी संशोधन केले असता त्यांना वर्धा नदीच्या किनारी धानोरा, भोयेगाव पुलाजवळ महाराष्ट्रात प्रथमच रानहल्ला, हरिण, डुक्कर आणि मानवी अल्प जीवाश्मे तसेच सोबत पाषाण युगिन अवजारे सापडली आहेत.ही शेवटच्या हिमयुगीन, प्लेइस्टेसीन काळातील २० हजार वर्षे दरम्यानची अतिशय नवीन प्राण्यांची जीवाश्मे असल्याची महत्वाची माहिती भूशास्त्र आणि पुरातत्व जाणकार प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली आहे.
आजपर्यंत भूशास्त्र विभागाला सुद्धा अशी जीवाश्म महाराष्ट्रात आढळली नाहीत. नदीजवळ आढळलेल्या प्राण्यात जास्त प्रमाणात बायसन जीवाश्म आढळले. कमी प्रमाणात 'वाईल्ड बोअर' चे दात, हरणाची हाडे,मानवाच्या पाषाण युगीन अवजारांसोबत काही मानवाची आणि प्राण्यांची हाडे मिळाली असून ती सुरेश चोपणे 'रॉक म्युझियम' मध्ये सुरक्षीत ठेवली आहेत.
पाषाण युगीन मानवांची अवजारे सुद्धा ह्या अलीकडील प्राण्यांच्या जवळच आढळली असून मानव त्यांची शिकार करीत होते हे सिद्ध होते. २० हजार वर्षा दरम्यान जगात हिमयुग होते, त्यानंतर ते तापमानामुळे वितळले आणि प्रचंड महापूर आला. ह्याच महापुरात विदर्भ आणि चंद्रपूर मधील सर्व प्राणी नदीत वाहून गेले आणि गाळात गाडले गेले. काही हजार वर्षानंतर त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले.
वर्धा नदीच्या वरोरा आणि चंद्रपूर तालुक्यातच काही ठिकाणी नदीत वाहून आलेला गाळ, रेती आणि दगड आढळतात आणि ह्याच ठिकाणी प्रा सुरेश चोपणे ह्यांना हत्ती आणि इतर प्राण्यांची जीवाश्मे सापडली आहेत. भूशास्त्र विभागाला अजूनही असे जीवाष्मे चंद्रपूर जिल्ह्यात आढळली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव