
ठाणे, 17 एप्रिल (हिं.स.)। अक्षय्य तृतीया या अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर सामूहिक आणि वैयक्तिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. मात्र, याच काळात बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात आले आहे. बालविवाह ही समाजाच्या विकासातील मोठी अडथळा असून या अनिष्ट प्रथेला रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ संपूर्ण राज्यात कडकपणे लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार बालविवाहाचे आयोजन करणे हा एक गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असून, यात सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रशासनाने या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्तरावर विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे अधिकारी बालहक्कांच्या संरक्षणासाठी आणि संभाव्य बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत. ठाणे जिल्ह्याला बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बालविवाह रोखणे ही केवळ सरकारी जबाबदारी नसून ती एक सामाजिक चळवळ व्हावी, यासाठी नागरिकांनाही आवाहन करण्यात आले आहे. जर कोणाला आपल्या परिसरात, कुटुंबात, मित्रमंडळीत किंवा नातेवाइकांमधे बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले, तर त्यांनी तत्काळ सतर्कता दाखवून प्रशासनाला माहिती द्यावी. यासाठी १०९८ किंवा १८१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या कार्यात एकत्र येऊन सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी पुढे यावे, जेणेकरून ठाणे जिल्ह्याला खऱ्या अर्थाने बालविवाह मुक्त करता येईल, असा विश्वास प्रशासनाने या प्रेसनोटद्वारे व्यक्त केला आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर