
अमरावती, 17 एप्रिल, (हिं.स.) - जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायतींच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत प्रामुख्याने केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी आणि आगामी वर्षातील विकासकामांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.
या सभेदरम्यान जिल्हा प्रशासनामार्फत 'प्रधानमंत्री आवास योजना' आणि 'स्वच्छ भारत अभियान' या योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अध्यक्ष व उपाध्यक्षांकडून योजनांच्या प्रत्यक्ष स्थितीची माहिती जाणून घेतली आणि त्याअनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणेला दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना 2026-27 अंतर्गत प्रस्तावित असलेल्या कामांचे नियोजन तातडीने करून, मे 2026 पूर्वी या कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी दिले. जेणेकरून पावसाळ्यापूर्वी विकासकामांना गती देता येईल. यासोबतच, विकासकामांसाठी प्राप्त होणाऱ्या निधीपैकी 1 टक्का निधी वृक्ष लागवडीसाठी राखीव ठेवून तो नियोजनपूर्वक खर्च करण्यावर भर देण्यात आला. बैठकीत प्राणी जन्मदर नियंत्रण आणि 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान' या विषयांवरही चर्चा करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या जाणून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना निर्देश दिले. या आढावा बैठकीत जिल्हा सहआयुक्त डॉ. विकास खंडारे यांनी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखून काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी