
रायगड, 17 एप्रिल (हिं.स.) : ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवत महिला सक्षमीकरणाचा आदर्श उभा करणाऱ्या श्रीम. सुषमा बालाजी गायकवाड यांनी आपल्या कार्यातून समाजात विशेष ओळख निर्माण केली आहे.
सुषमा बालाजी गायकवाडा या चिरनेर (ता. उरण, जि. रायगड) येथे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांनी महिलांना आधुनिक शेती व नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत ‘आत्मा’ योजनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पारंपरिक शेतीच्या पलीकडे विचार करण्यास प्रवृत्त केले. विशेषतः ऑयस्टर मशरूम लागवडीसारख्या उपक्रमांमुळे महिलांसाठी नवे उत्पन्नाचे स्रोत निर्माण झाले आहेत.
या उपक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, रोहा यांचे सहकार्य लाभले. प्रशिक्षण आणि साहित्याच्या मदतीने महिलांनी प्रत्यक्ष अनुभवातून शिकत उत्पादन सुरू केले. केवळ २० किलो बियाण्यांमधून ४० किलो उत्पादन घेऊन अवघ्या ७७० रुपयांच्या खर्चात २३ दिवसांत सुमारे १६ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण झाली.
स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणत त्यांनी “एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” हा विचार प्रत्यक्षात उतरवला. उत्पादनाला स्थानिक बाजारपेठ, हॉटेल्स आणि उपहारगृहांशी जोडून थेट विक्रीची व्यवस्था निर्माण करण्यात आली, ज्यामुळे महिलांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळू लागला आहे.
या उपक्रमाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले असून वंदना शिंदे, अर्चना सुळ-नारनवर यांसारख्या अधिकाऱ्यांचे सहकार्यही मिळाले आहे.
कृषी क्षेत्रासोबतच त्यांनी समाजसेवेतही सक्रिय सहभाग घेतला असून महिला सबलीकरण, ज्येष्ठ नागरिकांना मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि कोरोना काळात अन्नदान यांसारख्या उपक्रमांतही योगदान दिले आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत “संजीवन कलाविकास प्रतिष्ठान तेजस्विनी पुरस्कार” आणि “हिरकणी पुरस्कार” यांसारख्या सन्मानांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवत त्यांचे कार्य आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)