
बीड, 17 एप्रिल (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील १७७३ गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून १३ कोटी ६९ लाख रुपयांची महत्त्वपूर्ण मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राबवलेली पेपरलेस अर्ज प्रक्रिया आणि जिल्हा कक्षांची सक्रियता यामुळे या आर्थिक वर्षात ही मदत वेळेत पोहोचली. हृदयविकार, कर्करोग, यकृत प्रत्यारोपण आणि अपघातांसह २० गंभीर आजारांच्या उपचारांसाठी हा निधी रुग्णांच्या आयुष्यात नवी उमेद घेऊन आला आहे. राज्यभरातील ४० हजारांहून अधिक रुग्णांना एकूण ३३३ कोटींचे वाटप झाले असून पारदर्शक कार्यपद्धतीमुळे मदतीचा वेग वाढला आहे. टाटा मेमोरियल सेंटर आणि बीपीसीएल फाऊंडेशनसोबतच्या सामंजस्य करारामुळे आता बालकांच्या कर्करोग उपचारासाठीही विशेष सहाय्य मिळणार आहे. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी गरजू रुग्णांना अधिक माहितीसाठी १८००-१२३-२२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले असून हा निधी गरिबांसाठी खऱ्या अर्थाने 'आधार' ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis