आरोपीच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोलिसांची उपस्थिती; अमरावतीत खळबळ
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ, चौकशीचे आदेश अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अयान अहमद तनविर अहमदच्या वाढदिवसाच्या पार्टीत काही पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाल
आरोपीच्या अयान अहमद च्या  वाढदिवसाला पोलीसांची हजेरी?


व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ, चौकशीचे आदेश

अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) : गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अयान अहमद तनविर अहमदच्या वाढदिवसाच्या पार्टीत काही पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष स्वतंत्र तपास पथकातील (SIT) सहा जणांना तत्काळ बाजूला करण्यात आले असून त्यांना नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात या सहा कर्मचाऱ्यांपैकी काही जण आरोपीच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाल्याचे समोर आले आहे.

गंभीर गुन्ह्यातील आरोपीसोबत पोलीस कर्मचाऱ्यांचे संबंध असल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित कर्मचाऱ्यांचा आरोपीशी नेमका काय संबंध आहे, त्यांनी पार्टीत का सहभाग घेतला, यामागील कारणे काय आहेत, याचा तपास केला जाणार आहे.

या घटनेमुळे पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून निष्पक्ष तपासावरही शंका उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, व्हिडिओमध्ये आरोपीने “बॉस” असा उल्लेख असलेली टी-शर्ट परिधान करून फटाके फोडत वाढदिवस साजरा केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, उपस्थित पोलिसांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक भरवल्याचे दृश्य समोर आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

ज्या दिवशी आरोपीने सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केला, त्या वेळी पोलिसांनी कारवाई का केली नाही, उलट त्याच्यासोबत सहभाग का घेतला, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आधीच या प्रकरणात पोलिसांकडून हलगर्जीपणाचा आरोप होत असताना या नव्या व्हिडिओमुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande