
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) भाजपा नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावर जोरदार पलटवार करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अचलपूर-परतवाडा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात राणा यांनी खान यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे.
नवनीत राणा यांनी म्हटले की, अमरावतीतील कोल्हे हत्याकांडाच्या वेळी प्यारे खान यांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच नाशिकमधील टीसीएस प्रकरणातही त्यांनी मौन बाळगल्याचा आरोप त्यांनी केला. विविध संवेदनशील घटनांमध्ये अल्पसंख्यांक आयोगाकडून अपेक्षित ती भूमिका दिसून आली नाही, असेही त्यांनी नमूद केले.
राणा यांनी पुढे आरोप केला की, गरीब कुटुंबातील मुलींना जबरदस्ती बुरखा परिधान करण्यास भाग पाडणे, तसेच जबरदस्तीने मांस खाण्यास लावण्याच्या घटना घडल्या असताना आयोगाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अचलपूर-परतवाडा प्रकरणात अचानक दाखवलेली सक्रियता संशयास्पद वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला व मुलींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, त्या यापूर्वीही ठामपणे उभ्या राहिल्या आहेत आणि पुढेही ठामपणे उभ्या राहणार आहेत. कोणत्याही मुलीवर अत्याचार करणे, तिचे व्हिडिओ व्हायरल करणे किंवा तिचा गैरवापर करणे, अशा प्रकारांना कधीही माफ केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. याचबरोबर त्यांनी “लव्ह जिहाद”, “कोचिंग जिहाद” यांसारख्या विषयांवरही प्यारे खान यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. समाजात निर्माण होणाऱ्या अशा गंभीर प्रश्नांवर अल्पसंख्यांक आयोगाने स्पष्ट आणि ठोस भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नवनीत राणा यांनी पुढे म्हटले की, प्यारे खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि समाज तसेच महिलांची माफी मागावी. त्यांच्या वक्तव्यांमुळे समाजात संभ्रम आणि तणाव निर्माण होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
सध्याच्या परिस्थितीत अचलपूर-परतवाडा प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यातील वातावरण संवेदनशील बनले असून, राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निष्पक्ष तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी