समाधान शिबिर अभियानाने ग्रामीण भागातील विकासाला चालना - डॉ.शेफाली भुजबळ
लासलगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे नागरिकांच्या समस्या थेट सोडविण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख पाऊल असून, यातून ग्रामीण भाग
समाधान शिबिर अभियानाने ग्रामीण भागातील विकासाला चालना - डॉ.शेफाली भुजबळ


लासलगाव, 17 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे नागरिकांच्या समस्या थेट सोडविण्यासाठी उचललेले महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख पाऊल असून, यातून ग्रामीण भागातील विकासाला अधिक चालना मिळेल, असे प्रतिपादन डॉ. शेफाली भुजबळ यांनी केले. निफाड तालुक्यातील विंचूर आणि लासलगाव येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध दाखल्यांचे वितरणही करण्यात आले.

कार्यक्रमास आमदार किशोर दराडे, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, लासलगाव बाजार समितीचे सभापती डी. के. जगताप, तहसीलदार विशाल नाईकवाडी, मंडळ अधिकारी रुपाली साळवे, सरपंच सचिन दरेकर यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

यावेळी डॉ. शेफाली भुजबळ यांनी सांगितले की, शासनाच्या महसूल सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवणे आणि प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामुळे नागरिकांना त्यांच्या अडचणी थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळत असून त्या तात्काळ सोडविण्यावर भर दिला जात आहे.

शासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून प्रशासन अधिक पारदर्शक व उत्तरदायी करण्याचे काम या अभियानातून होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकाच ठिकाणी सर्व महसुली सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकरी वर्गासाठी हे अभियान विशेष लाभदायक ठरत असून जमीन नोंदीतील त्रुटी दूर झाल्याने मालकी हक्क अधिक स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे कर्ज, पीक विमा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हे महाराजस्व समाधान शिबिर केवळ शासकीय उपक्रम नसून नागरिकांच्या विश्वासाला बळकटी देणारे प्रभावी माध्यम ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

----------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande