
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)।
येथील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत येणाऱ्या बोर्डी नाला मध्यम प्रकल्पामुळे संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. या प्रकल्पासाठी सन २००६ ते २०१३ या कालावधीत सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टर रुपये ५ लाखांच्या दराने सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले असून या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.हा अनुदान वाटप सोहळा शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता मंगला माता संस्थान, पिंपरी तळेगाव (चांदूर बाजार – परतवाडा रोड) येथे पार पडला. या कार्यक्रमात पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अनुदानाचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाला अचलपूर मतदारसंघाचे आमदार मा. प्रवीणभाऊ वसंतराव तायडे प्रमुख उपस्थित होते व त्यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले. आमदार तायडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी