
छत्रपती संभाजीनगर, 17 एप्रिल (हिं.स.) : शहरातील बोधी ट्री एज्युकेशनल फाऊंडेशन संचलित माई वृद्धाश्रम आणि जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानदान महोत्सव’ अंतर्गत भव्य मोफत पुस्तक वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
ज्ञानाचा दीप प्रत्येक घरात पोहोचवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी आयोजक समाजभूषण रामदास रखमाजी वाघमारे यांचे अभिनंदन करून उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळून समाज अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना महापौर समीर राजूरकर म्हणाले की, “ज्ञान हीच खरी शक्ती आहे. अशा उपक्रमांमधून समाज अधिक प्रगल्भ आणि सक्षम होण्यास मदत होते.”
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis