
छत्रपती संभाजीनगर, 17 एप्रिल (हिं.स.) : शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या रमानगर येथील Refuse Transfer Station (RTS) प्रकल्पाची महापौर समीर राजूरकर आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या पाहणीदरम्यान सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रकल्पाची गुणवत्ता, गती आणि नियोजन यांचा विचार करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना महापौर आणि उपमहापौर यांनी दिल्या. शहर स्वच्छतेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्याची अंमलबजावणी जलद आणि प्रभावी पद्धतीने व्हावी, यावर त्यांनी विशेष भर दिला.
यावेळी उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी उपस्थित मान्यवरांना RTS प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. RTS हे अत्याधुनिक कचरा संकलन आणि वाहतूक केंद्र असून, शहरातील विविध भागातून गोळा होणारा कचरा येथे एकत्रित करून त्याची प्रक्रिया व पुढील वाहतूक अधिक सुलभ आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केली जाणार आहे.
या प्रणालीमुळे कचरा व्यवस्थापनात वेळेची बचत होण्यासोबतच वाहतूक खर्चातही कपात होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच, कचरा संकलनाची कार्यक्षमता वाढून रस्त्यांवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळेल.
स्वच्छ आणि सुस्थित शहर घडविण्यासाठी RTS सारखे प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावतील, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
----------------------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis