मोर्शीत शासकीय इमारतीची दयनीय अवस्था, तहसीलदार भाड्याच्या घरात
अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.) मोर्शी शहरातील हायवेलगत असलेले तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान सध्या पूर्णपणे धूळखात पडले असून त्याचे ‘भूत बंगल्या’त रूपांतर झाले आहे. अनेक वर्षांपासून येथे कोणताही तहसीलदार वास्तव्यास नसल्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली अ
मोर्शीत शासकीय इमारतीची दयनीय अवस्था, तहसीलदार भाड्याच्या घरात


अमरावती, 17 एप्रिल (हिं.स.)

मोर्शी शहरातील हायवेलगत असलेले तहसीलदारांचे शासकीय निवासस्थान सध्या पूर्णपणे धूळखात पडले असून त्याचे ‘भूत बंगल्या’त रूपांतर झाले आहे. अनेक वर्षांपासून येथे कोणताही तहसीलदार वास्तव्यास नसल्यामुळे इमारतीची दुरवस्था झाली असून परिसरात अस्वच्छता आणि अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. निवासस्थानाच्या स्वागताला जंगल तयार झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, या रिकाम्या पडलेल्या निवासस्थानाचा गैरफायदा घेत काही असामाजिक घटक येथे वावर करत असून विविध गैरकृत्यांना ऊत आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाच्या अगदी शेजारी शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, तसेच एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्यामुळे या गैरप्रकारांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर आणि मानसिकतेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इमारतीची अवस्था इतकी खराब झाली आहे की, ती जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, शासकीय निवासस्थान वापरण्यायोग्य नसल्यामुळे तहसीलदारांना भाड्याच्या घरात राहण्याची वेळ येत आहे, ही बाब प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. हायवे लगत असलेली ही मोक्याची जागा असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन या निवासस्थानाचे पुनर्बांधणी किंवा नूतनीकरण करावे, तसेच परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. मोर्शी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे शासकीय निवासस्थान पुन्हा उपयोगात आणणे गरजेचे असून, प्रशासन याकडे कधी लक्ष देणार? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande