डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने समिती पुनर्गठनावर वाद
रायगड, 17 एप्रिल (हिं.स.) । महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. नव्या समितीत ‘समरसता’वादी कार्यकर्त्यांचा समावेश झाल्याचा आरो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने समिती पुनर्गठनावर वाद


रायगड, 17 एप्रिल (हिं.स.) । महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन केल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. नव्या समितीत ‘समरसता’वादी कार्यकर्त्यांचा समावेश झाल्याचा आरोप करत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आंबेडकरी साहित्यिक यशवंत मनोहर यांनी या निर्णयावर कठोर टीका करत, समिती तातडीने बरखास्त करून खऱ्या आंबेडकरी अभ्यासकांची नवी समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे.

त्यांनी स्पष्ट केले की, डॉ.आंबेडकर यांच्या चरित्र व साधनांचे प्रकाशन ही अत्यंत जबाबदारीची बाब असून, त्यासाठी त्यांच्या विचारांचा सखोल अभ्यास असलेले आणि वैचारिक निष्ठा असलेले अभ्यासकच असणे आवश्यक आहे. सध्याच्या समितीच्या रचनेवरून शासन विशिष्ट अजेंडा राबवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर आंबेडकरी समाजात असंतोष वाढला असून, सोशल मीडियावरही या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी समितीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, मनोहर यांनी पर्यायी समितीसाठी काही नामवंत अभ्यासकांची नावेही सुचवल्याची माहिती आहे. या वादामुळे राज्यात सामाजिक आणि राजकीय स्तरावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शासन पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande