नंदुरबारच्या विकासावर भर- हसन मुश्रीफ
नंदुरबार, 17 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच
हसन मश्रीफ


नंदुरबार, 17 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी असलेल्या त्रुटींवर मात करून आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे बळकट करणे आणि नागरिकांना वेळेत उपचार मिळतील याची खात्री करणे यावर त्यांनी भर दिला.

शिक्षण क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी शाळांमधील पायाभूत सुविधा, डिजिटल शिक्षण साधने आणि शिक्षकांची नियमित उपस्थिती याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. शाळाबाह्य मुलांची संख्या कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी पाणीटंचाई निवारणासाठी दीर्घकालीन उपाययोजना, जलसंधारण प्रकल्प आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये पारदर्शकता राखण्याचे निर्देश दिले. प्रत्येक नागरिकाला सुरक्षित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बैठकीत विविध विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी ठोस वेळापत्रक आखण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी समन्वय वाढविण्यावर भर देण्यात आला.

तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, नागरिकांशी संवाद अधिक प्रभावी करणे आणि तक्रार निवारण प्रणाली सक्षम करणे यावरही बैठकीत चर्चा झाली. पुढील काळात अधिक गतीने काम करण्याचे आवाहन करत पालकमंत्र्यांनी “नंदुरबारचा सर्वांगीण विकास हा सामूहिक संकल्प आहे,” असे सांगत बैठकीचा समारोप केला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande