नवी मुंबईत 21 एप्रिल रोजी महिला जनसुनावणीचे आयोजन
ठाणे, 17 एप्रिल, (हिं.स.) - महिलांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सरसावला असून, ''राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी'' या उपक्रमांतर्गत नवी मुंबईत एका विशेष जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आ
नवी मुंबईत 21 एप्रिल रोजी महिला जनसुनावणीचे आयोजन


ठाणे, 17 एप्रिल, (हिं.स.) - महिलांच्या तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग सरसावला असून, 'राष्ट्रीय महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत नवी मुंबईत एका विशेष जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी मंगळवार, दि. 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी १०:०० वाजता सिडको भवन, 7 वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान प्रामुख्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाशी संबंधित प्रलंबित तक्रारींवर कार्यवाही केली जाणार असून, थेट येणाऱ्या तक्रारदारांच्या समस्यांचेही निराकरण करण्यात येईल.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जनसुनावणीमध्ये पीडित महिलांना आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात थेट आयोगासमोर मांडता येतील. अनेकदा पोलीस स्तरावर किंवा इतर विभागांमध्ये महिलांच्या तक्रारी दीर्घकाळ प्रलंबित राहतात, अशा प्रकरणांना गती मिळावी आणि महिलांना प्रत्यक्ष न्याय मिळावा, हा या जनसुनावणीचा मुख्य उद्देश आहे. या महत्वपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अपर आयुक्त (सामान्य प्रशासन), कोकण विभाग यांनी आवश्यक सूचना निर्गमित केल्या असून जिल्हा प्रशासनाकडूनही या सुनावणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

या जनसुनावणीचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. विशेषतः ज्या महिलांच्या तक्रारी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात प्रलंबित आहेत किंवा ज्यांना नवीन तक्रारी दाखल करायच्या आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आणि लेखी तक्रारीनिशी सकाळी १०.०० वाजता सिडको भवन येथे उपस्थित राहावे. राष्ट्रीय महिला आयोग थेट स्थानिक पातळीवर येऊन सुनावणी घेत असल्याने महिलांच्या समस्यांना वाचा फुटण्यास मोठी मदत होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande