महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ रत्नागिरीत कृतज्ञता वंदन
रत्नागिरी, 17 एप्रिल, (हिं. स.) : केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर करून देशाच्या राजकारणात महिलांचा सन्मान अधोरेखित केला आहे. या क्रांतीकारी निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी
महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनासाठी रत्नागिरीत फेरी


रत्नागिरी, 17 एप्रिल, (हिं. स.) : केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर करून देशाच्या राजकारणात महिलांचा सन्मान अधोरेखित केला आहे. या क्रांतीकारी निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नागिरी शहरात महिलांची एक अभूतपूर्व आणि भव्य फेरी काढण्यात आली.

शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ ते लक्ष्मीचौक या मार्गावर निघालेल्या या फेरीत हजारो महिलांनी अत्यंत उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेतला. हातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आणि ‘सशक्त नारी – सशक्त भारत’, ‘नारीशक्ती ने ठाना है’ अशा घोषणांनी संपूर्ण रत्नागिरी शहर दुमदुमून गेले होते. केवळ रत्नागिरी शहरच नव्हे, तर राजापूर, चिपळूण, संगमेश्वर यांसारख्या लगतच्या तालुक्यांमधूनही महिलांनी या फेरीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून विधेयकाचे स्वागत केले.

भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली या भव्य फेरीचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी महिलांना संबोधित करताना सौ. ढेकणे यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत विधेयकाचे महत्त्व पटवून दिले. महिलांना आता केवळ घरातच नव्हे, तर संसदेत आणि विधानसभेतही धोरण निश्चितीचा मान मिळणार आहे, हा क्षण सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. देशाच्या विकासात महिलांचा सहभाग आता आरक्षणाच्या कायदेशीर बळाने अधिक सक्षम होणार आहे. पंतप्रधान मोदींनी दिलेला हा शब्द पाळल्याबद्दल रत्नागिरीची प्रत्येक महिला आज कृतज्ञ आहे., असेही त्या म्हणाल्या.

लक्ष्मीचौक येथे या फेरीची सांगता झाली. यावेळी केवळ घोषणाबाजीच नव्हे, तर कृतीतूनही पाठिंबा दर्शवण्यात आला. उपस्थित हजारो महिलांनी भव्य फलकावर स्वाक्षऱ्या केल्या आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या क्रमांकावर 'मिस्ड कॉल' देऊन या ऐतिहासिक विधेयकावर मोहोर उमटवली. हा उपक्रम फेरीचे मुख्य आकर्षण ठरला.

या फेरीत रत्नागिरी पालिकेतील नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आणि रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande