रत्नागिरी : आर्थिक साक्षरता शिबिराला गणपतीपुळ्यात प्रतिसाद
रत्नागिरी, 17 एप्रिल, (हिं. स.) : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहार, शासकीय योजना आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गणपतीपुळे येथे विशेष आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या
आर्थिक साक्षरता शिबिराला गणपतीपुळ्यात प्रतिसाद


रत्नागिरी, 17 एप्रिल, (हिं. स.) : ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहार, शासकीय योजना आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी गणपतीपुळे येथे विशेष आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात भारतीय रिझर्व्ह बँकेसह विविध बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य महाप्रबंधक पुनीत पंचोली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आरबीआयच्या कामकाजावर प्रकाश टाकला.

बचतीची सवय लावणे आणि बदलत्या काळात डिजिटल अॅरेस्टसारख्या फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन श्री. पंचोली यांनी केले.

बँक ऑफ इंडियाचे उपमहाप्रबंधक बलराज टंडन यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME), स्वयं-सहाय्य गट (SHG) आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध बँक योजनांची सविस्तर माहिती दिली.

राज्यस्तरीय बँकर्स समितीचे (SLBC) उपमहाप्रबंधक दीपक पाटील यांनी सिबिल स्कोअरचे महत्त्व सांगून कर्जाची वेळेत परतफेड करण्याचे फायदे स्पष्ट केले.

यावेळी PMSBY योजनेअंतर्गत एका लाभार्थ्यास बँक ऑफ इंडियामार्फत २ लाख रुपयांच्या दाव्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. रिझर्व्ह बँकेचे श्रीकांत जाधव यांनी युपीआय (UPI) व्यवहार करताना घ्यायची काळजी आणि डिजिटल फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय सांगितले. जालना येथील उत्कर्ष अॅडव्हर्टायझिंगने सादर केलेल्या नुक्कड नाटकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले व आर्थिक साक्षरतेचा संदेश मनोरंजक पद्धतीने पोहोचविला.

शिबिरास बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र देवरे, आरबीआयचे प्रबंधक बेनझीर शेख, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, गणपतीपुळे शाखा व्यवस्थापक प्रथमेश सरमळकर, तालुका अभियान व्यवस्थापक साक्षी वायंगणकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

शिबिरात परिसरातील २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. बँक मित्रांच्या मदतीने यावेळी प्रधानमंत्री जनधन योजना, PMJJBY, PMSBY आणि अटल पेन्शन योजनेअंतर्गत (APY) नवीन नोंदणी करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande