
पुणे, 17 एप्रिल (हिं.स.)।
अनेक वर्षांपासून रखडलेल्या हडपसर परिसरातील समान पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिलअखेर काळेबोराटेनगर व गाडीतळ बसथांब्याजवळील योजनेच्या टाक्या व वितरणाचे काम होऊन याअंतर्गत येणाऱ्या सर्व भागांना समान पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिले आहे. यापूर्वीही वेळोवेळी अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, अद्यापी येथील योजना पूर्णत्वास आलेली नाही. त्यामुळे आतातरी महापालिकेकडून हे आश्वासन पाळले जाईल का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हडपसर गावठाण, गाडीतळ, सातववाडी, गोंधळनगर, पंधरा नंबर, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, विठ्ठलनगर, काळेबोराटेनगर, ससाणेनगर, माळवाडी आदी भागांमध्ये गेल्या तीस-चाळीस वर्षांपासून कमी-अधिक प्रमाणात कायम पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. शहराबरोबरच उपनगरांतील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून काही वर्षांपासून 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ही योजना रडत-खडत सुरू असल्याने अद्यापही येथील पाणी प्रश्न सुटू शकला नाही. योजनेच्या पाण्याकडे आ वासून बसलेल्या नागरिकांचा मात्र दरवर्षी हिरमोड होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु