
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) : अमरावती महापालिकेची आमसभा सोमवारी (ता. 20 एप्रिल) होणार असून, शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर तयार करण्यात आलेल्या विशेष अभ्यास समितीचा अहवाल या सभेत सादर केला जाणार आहे. स्वच्छता करार आणि निविदा प्रक्रियेमधील अटी-शर्थींमध्ये अनेक तफावती आढळल्याचे समितीने आपल्या तपासणीत नमूद केले आहे.
महापालिकेने स्थापन केलेल्या 19 सदस्यीय या समितीने मागील दीड महिन्यात तीन बैठका घेऊन संपूर्ण करारनाम्याचा आणि निविदा प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान अनेक विसंगती समोर आल्याचे समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील स्वच्छतेसाठी सुमारे 260 कोटी रुपयांचे सात वर्षांचे कंत्राट देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात शहरात अस्वच्छतेची परिस्थिती कायम असल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. वार्षिक 40 ते 45 कोटी रुपये खर्च करूनही नागरिकांना अपेक्षित स्वच्छता सुविधा मिळत नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग, अस्वच्छ नाल्या आणि कचरा जाळण्याच्या घटना यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
समितीने आपल्या शिफारशींमध्ये करारनाम्यात काही महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्याची सूचना केली आहे. त्यामध्ये नवीन स्वच्छता वाहने उपलब्ध करणे, नियमित फवारणी व धुराडीकरण करणे तसेच ब्लिचिंग पावडरचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे.
हा अहवाल आमसभेत सादर झाल्यानंतर महापालिकेच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी