
सोलापूर, 20 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. दररोज पाणीपुरवठा करण्याच्या मागणीवरून झालेल्या अभूतपूर्व गोंधळामुळे महापौर विनायक कोंड्याल यांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेना आणि काँग्रेसच्या गटनेत्यांना निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
सभागृहाचे कामकाज सुरू असताना सोलापूर शहरात दररोज पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. यावेळी विरोधकांनी प्रशासनाच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी सुरू केली. चर्चेचे रूपांतर वादात झाले आणि बघता बघता सभागृहात गोंधळ वाढला.
सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी आणि शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत महापौरांनी खालील दोन प्रमुख नेत्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे:अमोल शिंदे (गटनेते, शिवसेना - शिंदे गट)चेतन नरोटे (गटनेते, काँग्रेस)या दोन्ही नगरसेवकांना एका दिवसासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे.
शहरातील पाणीप्रश्न गंभीर असला तरी सभागृहाची प्रतिष्ठा राखणे गरजेचे आहे, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली. या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. महापौरांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विरोधकांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड