
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी आकर्षण ठरणारी वार्षिक वन्यप्राणी प्रगणना यंदा बौद्धपौर्णिमेच्या पर्वावर 1 व 2 मे 2026 च्या रात्री पार पडणार आहे. चांदण्यांच्या प्रकाशात जंगलातील पाणवठ्यांवर येणाऱ्या प्राण्यांची नोंद घेण्याचा हा अनोखा अनुभव असतो. मात्र, यंदाच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांसाठी काही कडक अटी लागू करण्यात आल्या असून, प्रत्येक सहभागीला हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वनविभागाने स्पष्ट केले आहे की, जंगलातील वास्तव्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीवर राहील. शासन किंवा वनविभाग यासाठी जवाबदार राहणार नाही. त्यामुळे “वन्यप्राणी प्रगणनेला जाताय का?… सावधान!” असा इशाराच वनविभागाने दिला आहे. सहभागी होणाऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. बौद्धपौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या काळात पाणवठ्यांवर येणाऱ्या तृणभक्षी तसेच हिंस्त्र प्राण्यांची उपस्थिती नोंदवून त्यांच्या संख्येचा अंदाज घेतला जातो. विशेषतः वाघांसारख्या दुर्मिळ प्रजातींच्या संवर्धनासाठी ही प्रगणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी राज्यातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पांना विशेष तयारीचे निर्देश दिले आहेत.
यामध्ये मेळघाट, ताडोबा-अंधारी, पेंच, बोर, नवेगाव-नागझिरा तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांचा समावेश आहे. संबंधित क्षेत्रांमध्ये पाणवठ्यांची व्यवस्था, निरीक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री, तसेच मनुष्यबळ यांची तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रगणना उपक्रमादरम्यान जंगलातील अग्नीप्रतिबंधक उपाययोजना, शिकारीविरोधी गस्त आणि इतर संरक्षणात्मक कामांवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठीही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सहभागी स्वयंसेवक व निसर्गप्रेमींसाठी पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. वन्यप्राण्यांच्या मुक्त हालचालीसाठी आणि मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी 1 व 2 मे रोजी कोअर, बफर आणि नियमित पर्यटन क्षेत्र पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे प्राण्यांचे नैसर्गिक वर्तन अडथळ्यांशिवाय निरीक्षण करता येणार आहे. दरम्यान, काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये जंगल सफारीसाठी आधीच बुकिंग पूर्ण झाले असल्याने अशा नियोजित सफारींना सशर्त सूट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अंतिम निर्णय मुख्यालय स्तरावर घेतला जाणार आहे. एकंदरीत, रोमांचक अनुभव देणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता असली, तरी यंदा सुरक्षिततेचे नियम आणि जबाबदाऱ्या अधिक कडक करण्यात आल्याने प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी