निलंग्यामध्ये ५ खाटांचे डायलिसिस सेंटर होणार, एक खाट कावीळसाठी
लातूर, 18 एप्रिल (हिं.स.) : निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पाच खाटांच्या मोफत डायलिसिस सेंटरचे काम पूर्ण झाले असून, ही सुविधा लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. निलंगा शहरात आतापर्यंत डायलिसिससाठी कोणतीही शासकीय सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे या न
डायलिसिस सेंटर


लातूर, 18 एप्रिल (हिं.स.) : निलंगा उपजिल्हा रुग्णालयात पाच खाटांच्या मोफत डायलिसिस सेंटरचे काम पूर्ण झाले असून, ही सुविधा लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे. निलंगा शहरात आतापर्यंत डायलिसिससाठी कोणतीही शासकीय सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे या नव्या केंद्रामुळे किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिस उपचार अत्यंत खर्चिक असून, एका सायकलसाठी सुमारे ५ हजार रुपये खर्च येतो. रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागते, त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामान्य कुटुंबांसाठी हा खर्च मोठा भार ठरत होता.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विविध शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या जिल्ह्यात उदगीर, रेणापूर आणि मुरुड येथील रुग्णालयांमध्ये ही सेवा सुरू असून, आता निलंगा उपजिल्हा रुग्णालयाची त्यात भर पडणार आहे.

विशेष बाब म्हणजे, या नव्या डायलिसिस सेंटरमधील पाच खाटांपैकी एक खाट कावीळ (हिपॅटायटीस) रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यामुळे संसर्गजन्य रुग्णांचे उपचार अधिक सुरक्षित पद्धतीने करता येणार आहेत.या सुविधेमुळे निलंगा परिसरातील शेकडो रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार मिळून आरोग्यसेवेत मोठी सुधारणा अपेक्षित आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande