नांदेड : ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ मोहिमेला गती
नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC)’ मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पशुपालकांना
नांदेड : ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ मोहिमेला गती


नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) : राज्यातील पशुपालन, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे ‘पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड (KCC)’ मोहीम राबविण्यात येत आहे.

या योजनेंतर्गत पशुपालकांना त्यांच्या पशुधनाच्या देखभालीसाठी आणि दैनंदिन खर्चासाठी खेळते भांडवल स्वरूपात आकर्षक व्याज सवलतीसह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड नाही, त्यांना 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण उपलब्ध होणार आहे. दूध संस्थेची हमी असल्यास ही मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवता येणार आहे. तसेच आधीपासून KCC असलेल्या लाभार्थ्यांना देखील 3 लाख रुपयांपर्यंतची पतमर्यादा वाढवण्याची सुविधा मिळणार आहे.

या कर्जाचा मूळ व्याजदर 9% असला तरी नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 3% आणि राज्य सरकारकडून 4% अशी एकूण 7% पर्यंत व्याज सवलत मिळणार आहे. बँकांकडून 2% अतिरिक्त सवलत दिल्यामुळे पात्र पशुपालकांना प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजदराचा लाभही मिळू शकतो.

सन 2026-27 पासून ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना या क्रेडिट कार्डद्वारे खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे. राज्यातील 10 लाख पशुपालकांना या योजनेच्या कक्षेत आणण्याचे उद्दिष्ट पशुसंवर्धन विभागाने ठेवले आहे.

या योजनेसाठी दूध सोसायटी, दूध संघ किंवा दूध उत्पादक कंपनीचे सभासद असलेले आणि अद्याप लाभ न घेतलेले पशुपालक पात्र ठरणार आहेत. अधिक माहितीसाठी 1962 या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पात्रतेनुसार पशुधनाची नोंदणी ‘एनडीएलएम (भारत पशुधन)’ पोर्टलवर आवश्यक असून, ठराविक मर्यादेतील पशुधन असलेल्या लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. कर्ज घेतल्यानंतर एक वर्षाच्या आत संपूर्ण परतफेड करणे बंधनकारक राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande