
नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले असून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळत आहे, असे प्रतिपादन नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक एक अंतर्गत नांदेड तालुक्यातील नाळेश्वर महसूल मंडळात आयोजित शिबिराचे उद्घाटन आमदार कल्याणकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार कल्याणकर यांनी सांगितले की, या शिबिरात विविध विभागांचे स्टॉल लावून योजनांची माहिती आणि लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवला जात आहे, ज्यामुळे जनतेला मोठा फायदा होत आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनीही या उपक्रमामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील नाळ अधिक मजबूत होत असल्याचे मत व्यक्त केले.
या शिबिरात 180 शेतकऱ्यांना सातबारा व 180 शेतकऱ्यांना 8-अ उतारे वितरित करण्यात आले. तसेच उत्पन्न, रहिवासी आणि जात प्रमाणपत्रांचेही मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. संजय गांधी योजनेअंतर्गत 16 लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात आला.
महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, पुरवठा, भूमी अभिलेख, शिक्षण विभाग तसेच इतर विविध विभागांच्या स्टॉलद्वारे नागरिकांना थेट सेवा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis