
नांदेड, 18 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अंतर्गत ‘क्रीडा प्रबोधिनी’ प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी जाहीर करण्यात आली आहे. प्रतिभावान खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, निवास, भोजन व अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे यांच्या अंतर्गत राज्यातील 9 ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून पुणे, कोल्हापूर, ठाणे, अमरावती, अकोला, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली येथे प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या प्रबोधिनींमध्ये ज्युदो, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, शुटिंग, फुटबॉल, जलतरण, ॲथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, आर्चरी, हँडबॉल, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, ट्रायथलॉन, सायकलिंग आणि बॉक्सिंग अशा 16 क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे – सरळ प्रवेश (50%) आणि खेळनिहाय कौशल्य चाचणी (50%). राज्य व राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी असलेल्या तसेच 19 वर्षांखालील खेळाडूंना सरळ प्रवेशाची संधी मिळणार आहे, तर इतरांसाठी कौशल्य चाचणी घेण्यात येईल. याशिवाय निवड झालेल्या खेळाडूंची वैद्यकीय तपासणीही अनिवार्य असेल.
जिल्हास्तरावर नोंदणीची अंतिम तारीख 22 एप्रिल 2026 असून संबंधित अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड येथे सादर करावेत. तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी 23 एप्रिल 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
विभागीय आणि राज्यस्तरावरील चाचण्या एप्रिल आणि मे 2026 दरम्यान विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना राज्यातील कोणत्याही क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.
या चाचण्यांसाठी येणाऱ्या खेळाडूंनी प्रवास, निवास व भोजन व्यवस्था स्वतः करावी लागणार असून आवश्यक कागदपत्रे जसे की जन्म प्रमाणपत्र, आधारकार्ड व क्रीडा प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
राज्यातील सुमारे 10 लाख खेळाडूंना या उपक्रमाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी दिली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis