खानदेशात ‘आखाजी’ सणाचा उत्साह; परंपरा, आठवणी आणि सांस्कृतिक रंगत
Akhaji's Akhaji'sMola's Sun Dekhoji,
Akhaji's Akhaji'sMola's Sun


नाशिक, 18 एप्रिल (हिं.स.) । खानदेश परिसरात अक्षय तृतीया या सणाला “आखाजी” म्हणून ओळखले जाते. हा सण केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीनंतर पहिल्यांदाच मुलींना माहेरी आणण्याची परंपरा. सासरहून मुलीला आणण्यासाठी तिचे वडील किंवा भाऊ जातात. या काळात परीक्षा संपलेल्या असल्याने मुलांसाठीही मामाच्या गावाला जाण्याची विशेष ओढ असते. माहेरी आलेल्या मुलीचे स्वागत मोठ्या आनंदाने केले जाते, तिच्या आवडी-निवडी जपल्या जातात आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.

आखाजीच्या निमित्ताने गावोगावी झाडांवर झोके बांधण्याची परंपरा दिसते. आंबा, पिंपळ किंवा कडुलिंबाच्या झाडांवर झोके घेत मुली आणि मैत्रिणी गाणी म्हणतात, गप्पा मारतात आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देतात. विशेषतः बहिणाबाईंच्या ओवी आणि पारंपरिक गाण्यांनी वातावरण रंगून जाते.

या सणात पारंपरिक पदार्थांचेही विशेष महत्त्व असते. केळीच्या पानावर आमटी-भात, कुरडई, पापड, भजी, पुरणपोळी आणि केशर आंब्याचा रस असा मेजवानीचा थाट असतो. जुन्या काळात गावरान आंब्यांचा आंबट-गोड रस पुरणपोळीसोबत खाल्ला जात असे, त्यामुळे या जोडणीला खास चविष्ट परंपरा मानली जाते.

आखाजीच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून धार्मिक विधीही केले जातात. घागर, सांजरी, कुरडई, पापड यांसह पूर्वजांच्या नावाने नैवेद्य अर्पण केला जातो. कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा देखील पाळली जाते. या दिवशी “डेरग” आणि “घागर” पूजन अशा दोन प्रकारच्या श्राद्ध परंपराही पार पडतात.

या सणाला सामाजिक रंगही आहे. गावोगावी जुगार, पत्ते खेळणे, तसेच पूर्वी कवड्यांचे खेळ खेळले जात असत. जावयांना जेवणासाठी विशेष आमंत्रण दिले जाते आणि कौटुंबिक मस्करीतून नाती अधिक घट्ट होतात.

लग्नासाठी शुभ मुहूर्त न पाहता आखाजीच्या दिवशीही विवाह लावण्याची परंपरा काही भागांत दिसून येते, त्यामुळे हा दिवस शुभ मानला जातो.

खानदेशातील आखाजी सण हा केवळ सण नसून, निसर्ग, कुटुंब, परंपरा आणि माणुसकी यांचा सुंदर संगम मानला जातो.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande