
छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल (हिं.स.)।
यंदाचीअक्षय्य तृतीया रविवारी (दि.१९) साजरी होत असून सकाळी १० वाजून ५० मिनिटांनंतर पुण्यकालास सुरुवात होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी केलेले प्रत्येक शुभकार्य अक्षय फल देणारे ठरते, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
'अक्षय्य' म्हणजे कधीही न संपणारे. त्यामुळे या दिवशी केलेले दान, जप, पूजन आणि खरेदी यांचे पुण्य कधीही कमी होत नाही. म्हणूनच नागरिकांनी योग्य वेळ साधून पूजन, दानधर्म आणि
खरेदी करावी
खरेदी व पूजनासाठी महत्त्वाचे मुहूर्त
०९:१८ ते १०:५३ - भूमी, वास्तू, गृहपयोगी वस्तू
१०:५३ ते १२:२८- सुवर्ण, चांदी, वाहन खरेदी
१४:०३ ते १५:३७ - वाहन, भूमी, वास्तू
०६:४७ ते २०:१२ - सुवर्ण व इतर खरेदीसाठी संपूर्ण दिवस शुभ
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी महाविष्णू यांनी परशुराम अवतार धारण केला, तसेच पवित्र गंगा नदी पृथ्वीवर अवतरली. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते. यंदा
कृत्तिका नक्षत्र, वृषभ राशीत शुक्राचे भ्रमण आणि शुक्र-चंद्र युती असे शुभयोग आहे. यामुळे धन, धान्य, सुख आणि समृद्धीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या वेळेत केलेली खरेदी चिरकाल टिकणारी आणि लाभदायक मानली जाते. या दिवशी विशेषतः लक्ष्मी-नारायण यांचे पूजन केल्यास घरात सुख-समृद्धी येते. तसेच पितरांच्या उद्देशाने माठ, आंबे, टरबूज, खरबूज, छत्री, चप्पल यांचे दान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दान करताना पुढील मंत्र म्हणणे हितावह मानले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis