
पुणे, 18 एप्रिल (हिं.स.) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वीज वितरण समस्यांबाबत आज प्रकाश भवन, सेनापती बापट मार्ग, पुणे येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मा. ना. श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांनी भूषविले.
या बैठकीत आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी शहरातील वाढत्या वीज समस्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी विशेषतः शहरासाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्याची जोरदार मागणी केली.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरीतील संभाजीनगर, काळभोरनगर, विद्यानगर, दत्तनगर, इंदिरानगर, शंकरनगर, मोरवाडी, आकुर्डी, प्राधिकरण, पिंपरी गाव, दापोडी आणि संत तुकाराम नगर या भागांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
सध्या या भागांना टाटा टेल्को उपकेंद्रामार्फत वीजपुरवठा केला जात आहे. मात्र त्याच उपकेंद्रावरून चाकण, आनंदी, जाधववाडी, चिखली यांसारख्या दूरच्या भागांनाही वीजपुरवठा होत असल्याने त्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पिंपरी शहरासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी बैठकीत स्पष्ट केले. यामुळे वीजपुरवठा अधिक सुरळीत होईल आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.
------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु