
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) : भाजप शिक्षक आघाडी व शिक्षक महासंघ अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शिक्षक मेळावा व सत्कार समारंभाचे आयोजन 19 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात विभागातील 100 अनाथ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात येणार असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांचा विशेष सत्कार केला जाणार असल्याची माहिती शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी राहणार असून, प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, कामगार मंत्री आकाश पुंडकर तसेच शालेय शिक्षण व गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरवर्षी 19 एप्रिल रोजी सामाजिक उपक्रम राबविण्याच्या परंपरेनुसार यंदा अनाथ विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मेळाव्याला विभागातील अधिकाधिक शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी