
ग्रामीण जीवनाच्या संवेदनशील चित्रणाचे मान्यवरांकडून कौतुक
नागपूर, 18 एप्रिल (हिं.स.) : ज्येष्ठ पत्रकार अविनाश महालक्ष्मे यांच्या “घानमाकड” या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचा प्रकाशन समारंभ शनिवारी सीताबर्डी येथील सेवासदन संस्थेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि संवेदनशील पत्रकारितेचे विविध पैलू अधोरेखित करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध लेखक आणि वक्ता आशुतोष अडोणी, ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी आणिकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्य समिक्षक वि.स. जोग प्रमुख्याने उपस्थित होते.
प्रकाशन कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक आशुतोष अडोणी यांनी सांगितले की, “सामाजिक संवेदनशीलता ही अविनाश महालक्ष्मे यांच्या पत्रकारितेची प्रमुख ओळख आहे. त्यांनी अनेकांच्या मूक वेदनांना आवाज दिला आहे. ‘घानमाकड’ हे पुस्तक ग्रामीण भागातील आठवणींचा सुंदर आवर्त मांडते आणि ते संवेदनशीलतेचा व चांगुलपणाचा संगम असल्याचे अडोणी यांनी यावेळी सांगितले. तर ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांनी अविनाश महालक्ष्मे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, ते अत्यंत संवेदनशील पत्रकार असून “समाजाने दिलेले समाजालाच परत करणे” ही त्यांची वृत्ती आहे. या पुस्तकातून त्यांनी आपल्या ग्रामीण मुळांशी पुन्हा नाते जोडले आहे. प्रकाशन समारंभाचे अध्यक्षपद भूषविणारे प्रख्यात विचारवंत आणि समीक्षक डॉ. वि. स. जोग यांनी “घानमाकड” मधून ग्रामीण जीवनाचे प्रामाणिक आणि वास्तवदर्शी चित्रण उभे राहत असल्याचे नमूद केले. या प्रसंगी पुस्तकाचे मुखपृष्ठकार अजय रायबोले आणि अमर अणे यांचा सत्कार करण्यात आला. प्रवीण खापरे यांनी लेखक अविनाश महालक्ष्मे यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन वैशाली महालक्ष्मे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis