पर्जन्यमापक नोंदीत गोंधळ; शेतकऱ्यांसमोर संकटाची चाहूल मंडळांच्या आकडेवारीची तफावत शेतकऱ्यांसाठी तोट्याचे संकेत
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) मागील दोन दिवसांपासून उष्ण तापमानाचा आकडा वाढता आहे. अशातच शासनाने मंडळामध्ये बसविलेले पर्जन्यमापक यंत्रापैकी पथ्रोटचे पर्जन्यमापक यंत्र हे ओलिताच्या सानिध्यात असल्यामुळे इतर मंडळांच्या तुलनेत तापमानाच्या आकडेवारीत फरक
पर्जन्यमापक नोंदीत गोंधळ; शेतकऱ्यांसमोर संकटाची चाहूल


अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) मागील दोन दिवसांपासून उष्ण तापमानाचा आकडा वाढता आहे. अशातच शासनाने मंडळामध्ये बसविलेले पर्जन्यमापक यंत्रापैकी पथ्रोटचे पर्जन्यमापक यंत्र हे ओलिताच्या सानिध्यात असल्यामुळे इतर मंडळांच्या तुलनेत तापमानाच्या आकडेवारीत फरक दिसून येत आहे. सदरचा फरक हा हवामान आधारित विमा कंपनीकडे वर्ग करण्यात येत असल्याने पुढे त्यांच्याकडून मिळणारी मदत ही शेतकऱ्यांसाठी तोट्याचे संकेत देत आहे.

शासनाकडून निर्धारित केलेल्या मंडळात परतवाडा, देवमाळी, परसापूर, पथ्रोट, रासेगाव व असदपूर, अशा सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. उष्ण तापमानाची आकडेवारी या पर्जन्यमापक यंत्रामध्ये मोजल्या जाते. तेथून ती थेट शासन दरबारी पोहोचविली जाते. मग उष्ण तापमानाची ती आकडेवारी शासनदरबारातून विमा कंपनीकडे वर्ग करण्यात येते. त्यावेळी शेतकऱ्यांना हवामान आधारित पीकविमा मंजूर करताना सदरच्या आकडेवारीवरून नेमके मदत देण्याचे निकष ठरविले जाते. ज्या पर्जन्यमापक यंत्रावरील आकडेवारी अधिक उष्णतामानाची तिथे मदत मंजूर केली जाते. परंतु फक्त ओलित क्षेत्राच्या सानिध्यात असलेल्या पर्जन्यमापक यंत्रामुळे जर का उष्ण तापमानतेचा आकडा शासनदरबारी कमी नोंद होत असेल तर त्याठिकाणावरून विमा कंपनीला पाठविण्यात आलेल्या कमी आकडेवारीमुळे शेतकऱ्यांना हक्काची मदत मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. गुरुवारी (ता. १७) १२.५३ मिनिटांनी पथ्रोट येथे उष्ण तापमानाचा आकडा हा ३७ डीग्री सेल्सिअस होता. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत परतवाडा, देवमाळी चाळीस डीग्री, परसापूर बेचाळीस डीग्री, पथ्रोट सदतीस डीग्री, रासेगाव व असदपूर एकेचाळीस डीग्री सेल्सिअसची नोंद घेण्यात आली.

सूर्यदेवतेचे उष्ण तापमान एकसारखे असताना ओलित व कोरडवाहू क्षेत्रात लावण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रावर तफावत दाखविणारी आकडेवारी दिसत असल्याने हवामान विभागाने सदरचे पर्जन्यमापक यंत्र हे योग्य ठिकाणी लावावे जेणेकरून हवामान आधारित पीकविमा सारख्या शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांना व्यवस्थित लाभ मिळणे सोयीचे होईल. नाहीतर मग सूर्यदेव पथ्रोटवरच मेहरबान होते का? असा प्रश्न उपस्थित होऊन वाद उत्पन्न होण्याआधीच हवामान विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ती खबरदरी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande