संघर्षात मिळाला माविमंचा आधार; संगीताने घडवली यशोगाथा
छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल, (हिं.स.)। कोरोना काळात रोजगार बंद पडल्याने उपासमारीची वेळ आलेल्या एका महिलेने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाच्या आधाराने मार्ग काढत लहानसा व्यवसाय करीत कुटुंबाचा आर्थिक पाया भक्कम केला. पैठण तालुक्यातील शेवता
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल, (हिं.स.)। कोरोना काळात रोजगार बंद पडल्याने उपासमारीची वेळ आलेल्या एका महिलेने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाच्या आधाराने मार्ग काढत लहानसा व्यवसाय करीत कुटुंबाचा आर्थिक पाया भक्कम केला. पैठण तालुक्यातील शेवता येथील संगीता रामेश्वर नेमाडे यांनी बचत गटाच्या माध्यमातून मासेमारी, शेळीपालन आणि कुक्कुटपालन व्यवसाय उभा करत स्वावलंबनाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

कोरोना महामारी दरम्यान कामधंदा बंद पडल्याने संगीता नेमाडे यांना कुटुंबासह जालना येथील सासर सोडून माहेरी शेवता ता. पैठण येथे यावे लागले. आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढे काय करावे? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता. सुरुवातीला शेतमजुरी करून पाहिली, मात्र त्यातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर कुटुंब चालवणे कठीण झाले.

शेवता परिसर जायकवाडी धरणाजवळ असल्याने येथे मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. याच संधीचा लाभ घेत संगीता आणि त्यांच्या पतीने मासेमारी सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला स्वतःचे साधनसामग्री नसल्याने इतरांवर अवलंबून राहावे लागत होते, त्यामुळे उत्पन्नही कमी मिळत होते.

दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत एकता लोकसंचालित साधन केंद्र, पैठण यांच्या माध्यमातून बचत गट स्थापन करण्याची माहिती मिळाली. संगीता यांनी पुढाकार घेत ‘आराधना’ बचत गट स्थापन केला. या गटाच्या माध्यमातून त्यांना ‘व्हीएसपी’ योजनेतून १५ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. या निधीतून त्यांनी मासेमारीसाठी आवश्यक जाळे खरेदी केले आणि स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू केला.

यानंतर साधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेळीपालन व्यवसायातही प्रवेश केला. २० हजार रुपयांच्या कर्जातून खरेदी केलेल्या शेळ्यांपासून अल्पावधीतच उत्पन्न मिळू लागले. पिल्लांची विक्री करून त्यांनी चांगली कमाई केली आणि पुढे हा व्यवसाय विस्तारत नेला. आज त्यांच्या शेळीपालनातून वार्षिक उत्पन्न जवळपास एक लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

पुढे गटाला बँकेकडून १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या निधीतून संगीता यांनी मासेमारी व्यवसायात अधिक गुंतवणूक केली. त्यासोबतच कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून त्यांनी उत्पन्नाचे आणखी एक साधन निर्माण केले. केवळ दोन महिन्यांत पक्षी विक्रीतून मोठा नफा मिळवत त्यांनी आपली आर्थिक प्रगती अधिक मजबूत केली.

सध्या संगीता नेमाडे यांना विविध व्यवसायांमधून दरमहा सुमारे २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळत असून वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या घरात गेले आहे. त्यांच्या या यशामागे एकता लोकसंचालित साधन केंद्र, पैठण यांचे मार्गदर्शन व आर्थिक मदत महत्त्वाची ठरली आहे.

“संघर्ष कितीही मोठा असला तरी उद्योगाचा आधार घेतला, तर यश नक्की मिळते,” असा संदेश देत संगीता नेमाडे यांची ही यशोगाथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande