
रायगड, 18 एप्रिल (हिं.स.) : पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली असून, संबंधित ठिकाणी केमिकल साठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अचानक मोठा स्फोटसदृश आवाज झाल्यानंतर आकाशात काळ्या धुराचे प्रचंड लोट उसळताना दिसले. काही क्षणांतच परिसर दाट धुराने झाकोळला गेला. ही आग गोदामे आणि कंटेनर यार्ड परिसरात लागल्याचे प्राथमिक समजते. धुराची तीव्रता इतकी होती की काही काळ दृश्यमानताही मोठ्या प्रमाणात कमी झाली.
घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कामगारांनी सुरक्षिततेसाठी धावपळ केली. संबंधित ठिकाणी केमिकल साठा असल्याने आग अधिक भडकण्याची तसेच स्फोट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने परिसरात सतर्कता वाढवली आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलासह इतर आपत्कालीन यंत्रणा तात्काळ दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शॉर्टसर्किट किंवा केमिकल रिऍक्शनमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)