
नाशिक, 18 एप्रिल, (हिं.स.)। जागतिक वारसा दिनानिमित्त 'इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज'तर्फे आयोजित 'गोदा संवाद' ही वारसा फेरी शनिवारी सकाळी उत्साहात पार पडली.
नाशिकचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी अनेक नागरिक या फेरीत सहभागी झाले होते. या उपक्रमात नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, इन्टॅक नाशिक चॅप्टर आणि पुरातत्व विभाग, नाशिक यांच्या प्रतिनिधींनीही सक्रिय सहभाग नोंदवला. याच औचित्यावर 'इन्टॅक' नाशिक चॅप्टर तर्फे नाशिकच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती देणाऱ्या 'गाईड बुक'चे प्रकाशन करण्यात आले.
सकाळी ६:३० वाजता खंडोबा मंदिर, गंगाघाट येथून या फेरीला सुरुवात झाली. तेथून मार्गक्रमण करत ही फेरी दहीपुल, तीळ भांडेश्वर मंदिर, आणि मेनरोडवरील गणपती मंदिर येथे पोहोचली. या प्रवासात अभ्यासकांनी नाशिकमधील प्राचीन मंदिरे, आणि सरकारवाड्याचे ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. या वारसा फेरीचा समारोप गोदाकाठावरील ऐतिहासिक बालाजी मंदिर येथे करण्यात आला. केवळ इमारतीच नव्हे, तर नाशिकच्या जुन्या परंपरा, सण-उत्सव आणि कला यांसारखा 'अमूर्त वारसा' शहराच्या ओळखीसाठी किती महत्त्वाचा आहे, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी इरा सेंटर चे विनय जोशी, अनिता जोशी,अनिकेत गाढवे, प्रसाद गर्भे, डॉ. स्नेहल दंताळे, नाशिक त्र्यंबक कुंभमेळा तहसीलदार मकरंद दिवाकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कुंभमेळा आणि शहराचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले 'इरा सेंटर'चे हे १२ वे सत्र होते. नाशिकच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी आणि तरुणांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV