
नाशिक, 18 एप्रिल, (हिं. स.) : नाशिक शहराचे माहात्म्य आणि महत्त्व वारसास्थळांमध्ये दडलेले आहे. नाशिकच्या इतिहासाचे वारसदार असलेल्या असंख्य वास्तूंना समजून घेतल्यास नाशिकचा जाज्ज्वल्य इतिहास उलगडू शकतो. यासाठी नाशिक कथातर्फे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नासिक इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष योगेश कासार-पाटील यांनी व्यक्त केले.
नाशिक कथा आणि नाशिक इतिहास संशोधन मंडळाच्या संयुक्त आज जागतिक वारसा दिनानिमित्ताने नदीला जाणून घेऊया या उपक्रमाअंतर्गत गोदावरी नदीच्या वारसा वॉकचे आयोजन केले होते. यावेळी ७० हून अधिक नासिककरांनी वॉकमध्ये सहभाग घेतला.
कासार-पाटील म्हणाले, ‘नाशिकच्या वारसास्थळांचा पुरातत्त्वीय अंगाने अभ्यास होण्याची गरज आहे. यासाठी नाशिक कथाच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांना नासिककरांनी बळ द्यावे. वारसास्थळे, जिल्ह्यातील नद्या, मंदिरे, लेणी यांचा अभ्यास करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यायला हवा.’
वॉकला दुतोंड्या मारुतीपासून सुरुवात झाली. दुतोंड्या मारुती, नारोशंकर मंदिर, कपूरथळा, गाडगेबाबा धर्मशाळा या वास्तूंची माहिती घेत गोदावरीचे महत्त्व व माहात्म्याबाबत गोदावरी नदीच्या अभ्यासक व नासिक कथाच्या प्रमुख डॉ. शिल्पा डहाके यांनी माहिती दिली
नाशिक इतिहास संशोधन मंडळाचे सचिव चेतन राजापूरकर, सोमनाथ मुठाळ, मृणमयी पेंडसे, संजय बिरारी, महेश शिरसाट यावेळी उपस्थित होते.
गोदावरी नदीच्या वॉक दरम्यान डॉ. शिल्पा डहाके यांनी नाशिकच्या पवित्र केंद्र असलेले गोदावरी नदीचे महत्त्व उलगडले. गोदावरी ही केवळ नदी नाही ती एक कथा, परंपरा आणि दैनंदिन जीवनाचा जिवंत वारसा असल्याचे सांगताना जुन्या नासिकचे परिसरातील वाडा संस्कृती, जुनी घरे, घाट आणि गोदेची पुराणकथांचा आढावा घेतला. शहराची पायाभूत रचना आणि दैनंदिन व्यवहार आजही नदी आणि शहराला कसे आकार देत आहेत, हे जाणून घेण्याची संधी यावेळी वॉकदरम्यान नासिककरांना मिळाली. नासिक कथातर्फे नियमित हेरिटेज वॉकच्या माध्यमातून नासिक शहराचे महत्त्व उलडगले जाईल असेही डॉ. शिल्पा डहाके यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी